पुणे- महापालिकेतील महिला अधिकार्यांकडे काही काम नसताना त्यांचा वारंवार पाठलाग करुन त्यांची बदनामी करुन चारित्र्यावर शिंतोडे उडविणार्या भाजपचा पदाधिकारी ओंकार कदम याच्यावर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ओंकार कदम (रा. मॉडेल कॉलनी), अक्षय कांबळे व त्याचे ६ साथीदार यांच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ जानेवारी पासून आतापर्यंत सुरु होता.
भाजपचा पदाधिकारी ओंकार कदम हा महापालिकेतील एका वैद्यकीय महिला अधिकार्याला दमदाटी व छळ करत होता. महापालिकेच्या आवारात येऊन तो हा प्रकार राजरोसपणे करत होता. परंतु, सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने या महिला अधिकार्याच्या तक्रारीची कोणी दखल घेतली नाही. फक्त पोलिसांना एक गोपनीय पत्र देऊन या घटने संदर्भातील माहिती दिली होती. तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश भोसले यांनी कोणतीही कारवाई केली नाही. शेवटी या महिला अधिकार्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यांनी याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले. नुकतेच बदली होऊन पुणे महापालिकेत आलेले नवल किशोर राम यांनी यावर कारवाई करुन ओंकार कदम व त्याच्या साथीदारांना महापालिका आवारात येण्यास बंदी घातली. परंतु, त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नव्हता. शेवटी मंगळवारी रात्री ११ वाजून २ मिनिटांनी पोलिसांनी या महिला अधिकार्याची फिर्याद घेऊन ओंकार कदम व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी यांचे फिर्यादी यांच्याकडे काही काम नसताना त्यांचा वारंवार पाठलाग करुन त्यांच्या विभागाचे शिपाई व अधिकारी यांचे समक्ष वाईट साईट कॉमेंन्ट्स केल्या असून फिर्यादी यांची नाहक बदनामी होऊन चारित्र्यावर शिंतोडे उडाल्याने त्यांना त्रास सहन होत नसून त्यांची घुसमट केली. त्यांना कार्यालयामध्ये येण्यास भिती वाटू लागली आहे. तसेच त्यांचे सहकारी यांना वावरण्यास त्रास होत आहे. पोलीस उपनिरीक्षक हिरे तपास करीत आहेत.