पुणे-
रविवारचा वार हा पर्यटकांसाठी अपघातवार ठरला. मावळातील कुंडमळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पर्यटकांच्या बचावासाठी सलग दुसऱ्या दिवशी एनडीआरएफकडून बचावकार्य राबवले जात आहे.
दरम्यान, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे समोर आली आहे. चार जणांचा मृत्यू झाला असून 51 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये चंद्रकांत साठले, रोहित माने, विहान माने यांचा समावेश असून एक जणाची ओळख पटलेली नाही. जखमी रुग्णांवर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी रविवारी खासदार सुप्रिया सुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुनील शेळके यांनी भेट देत पाहणी केली. रात्री उशीरा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी भेट दिली.
पाच लाखांची मदत
पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. पूल नादुरुस्त होता. प्रशासनाच्या वतीने येथे पुलाचा वापर करू नये म्हणून फलक देखील लावले होते. मात्र, पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.