आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे ग्रामीण

आयुष्य उद्ध्वस्त करेन! जीव घेण्याची धमकी, पोलिस निरीक्षकासह 2 पोलिसांवर गंभीर आरोप; पत्र लिहून हवालदार गायब

नितीन देशपांडे   79   11-06-2025 12:08:45

इंदापूर(पुणे) : पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे मंगळवारी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता आहेत. त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून, त्यामध्ये पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांवर जीवाला धोका निर्माण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय?

विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या चिठ्ठीत लिहिले आहे की, "गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी, हवालदार रासकर व कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून, मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 'तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन' अशा शब्दांत धमकावलं गेलं."

त्यांनी त्यांच्या पत्नीला एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवले आहे. चिठ्ठीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, "माझ्या या अवस्थेला पोलीस निरीक्षक कोकणे जबाबदार आहेत."

पत्नीचा आक्रोश आणि इशारा

विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस निरीक्षक कोकणे यांना थेट सवाल केला आहे: "खात्याबाहेर तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देत आहात?" त्यांनी इशारा दिला की, "माझ्या पतीला न्याय मिळाला नाही, तर मी मुलांसह आत्महत्या करीन."

पोलीस यंत्रणा सतर्क

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत, हवालदार केमदारणे यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली. त्यांनी सांगितले की, चिठ्ठीद्वारे करण्यात आलेल्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी करण्यात येईल आणि त्याचा अहवाल तयार केला जाईल.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.