पिंपरी चिंचवड प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने देशभरात ‘संकल्प ते सिद्धी’ हे अभियान सुरू केले आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, या अभियानाचाच एक भाग म्हणून, पिंपरी-चिंचवड शहरात बुधवार, ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गोविंद गार्डन बॅंक्वेट हॉल, पिंपळे सौदागर, येथे जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियान हे केंद्र सरकारच्या विविध विकास योजना आणि कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ४ कोटी लोकांना पक्की घरे, ‘हर घर जल’ योजना, आयुष्मान भारत योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. तसेच, २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सहभागी करून घेणे, हे देखील या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सरकारच्या कामगिरीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणे हे देखील या कार्यशाळेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यशाळेला प्रदेश महामंत्री राजेश पांडे आणि जिल्हा प्रवासी ऍड. वर्षा डहाळे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. आगामी सर्व कार्यक्रमांच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.