धायरी प्रतिनिधी- सिंहगड रस्ता परिसरातील धायरी नर्हे रस्त्यावर नवले औद्योगिक वसाहतीत रात्रं-दिवस पाण्याच्या टँकरची वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी रस्ते अरुंद असून, घरांचे दरवाजेही रस्त्यांलगत आहेत. भरधाव वेगाने जाणार्या टँकरमुळे अपघातांचा धोका नाकरता येत नाही.
नागरिक बेदरकार टँकरचालकांच्या वाहतुकीमुळे त्रस्त झाले असून, त्यांना रस्त्यांवरून पायी चालणेदेखील अवघड झाले आहे.
परिसरातील एका खासगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी हे टँकर येत असतात. टँकरच्या कर्कश हॉर्नमुळे झोपमोड होत असल्याने आरोग्यावर विपरीत परिणात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यास करणेही अवघड झाले आहे.
अरुंद रस्त्यांवरून कामगार, महिला, विद्यार्थी, नागरिक व ज्येष्ठ नागरिकांची सतत वर्दळ असते. अरुंद असलेल्या रस्त्यावरच टँकरच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे इतर रस्त्यांवरील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. टँकरच्या गर्दीतून पाची
चालणे देखील महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना अवघड झाले आहे. बेदकार टँकरचालकांमुळे परिसरात छोटे, मोठे अपघात होत आहेत. या त्रासातून सुटका न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला निवदेन देण्यात आले आहे.
रहिवासी सुभाष थेऊरकर, प्रशांत नांदगुडे, रवींद्र मानकर, तुळशीराम बाळशंकर यांनी सांगितले की, आम्हाला या टँकरच्या आवाजाने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर लहान मुले खेळत असल्याने अपघाताचा धोका नाकारता येत नाही.
विहीर मालक श्रीहर्ष मराठे म्हणाले की, या ठिकाणी आमची वडिलोपार्जित विहीर आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा अल्प आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे टँकरच्या माध्यमातून आमच्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत महापालिकेच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे.
-नामदेव बजबळकर, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयखासगी विहिरीवरून होणार पाणीपुरवठा आणि टँकर वाहतूक हा क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील विषय नाही. हा विषय वाहतूक विभाग आणि महासूल विभागाचा आहे. -अर्चना ढेंबरे, मंडल अधिकारीखासगी विहिरीवरील पाणीपुरवठ्याबाबत महसूल विभागाकडे अद्याप कोणतीही तक्रार आली नाही. याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल