आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune Robbery Case: ससूनला तासभर घालवला अन् भोसरी गाठली; सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्यांना बेड्या

नितीन देशपांडे   567   18-04-2025 14:44:31

धायरी पुणे- (Pune news) धायरी येथील रायकर मळा येथे श्री ज्वेलर्स या सराफा दुकानात शिरून नकली पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या दोन सराइतांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ने भोसरी येथून बेड्या ठोकल्या.

महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपींनी ससून रुग्णालयाचा आसरा घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

 

राजेश उर्फ राजू चांगदेव गालफाडे (४०) आणि श्याम शेषेराव शिंदे (३७, दोघे रा. लांडेवाडी, झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सराफा व्यावसायिकाने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. काळुबाई चौकात श्री ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार मंगळवारी (दि. १५) दुकानात होते. त्यावेळी सराईत आरोपींनी दुकानात शिरून सोन्याचे दागिनेचोरी करून दुचाकीवर पोबारा केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांची सात पथके आरोपींच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती. तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळील दुचाकी सिंहगड रस्त्यावरील एका गणपती मंदिराच्या परिसरात सोडली. तेथून पुढे ते एका रिक्षात बसून निघून गेल्याचे दिसून आले. मात्र, रिक्षात बसण्यापूर्वी त्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तसेच ज्या रिक्षात ते बसले त्या रिक्षाचा मागही काढण्यात आला. ती रिक्षा ससून रुग्णालयाच्या परिसरात गेल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी तासभर ससून रुग्णालयाच्या परिसरात घालवला. त्यानंतर चोरट्या मार्गाने त्यांनी भोसरी गाठली. दरम्यान आरोपी हा भोसरी परिसरात असल्याची माहिती मिळताच दोघांना अटक करण्यात आली. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार, सहायक निरीक्षक सी. बी. बेरड, सहायक उपनिरीक्षक दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, अंमलदार गणेश लोखंडे, सुरेश जाधव, शशिकांत नाळे आणि अमोल सरतापे यांच्या पथकाने केली. 

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.