पुणे (Pcmctahalka.in)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मोठ्या घोषणा केल्या आहेत. टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्याकरता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
त्याकरता फास्टटॅग पद्धत अनिवार्य केली आहे. परंतु, फास्टटॅग करताही टोलनाक्यावर गाड्यांना उभे राहावे लागते. भारतातील टोलनाकेच आता बंद व्हावेत, याकरता केंद्राने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे, असे गडकरी म्हणाले.
दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, रस्ते बांधणीसाठी यंदा तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या माध्यमातून नवे रस्ते बांधले जात असताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या रस्त्यावर जितके किलोमीटर गाडी चालवली जाईल, तितकाच पथकर घेतला जाईल, असे धोरण लवकरच आणण्यात येणार आहे.
पुढे ते म्हणाले की, विकासाचा संबंध रस्त्यांशी आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात रस्ते, महामार्गांचा मोठा वाटा आहे. देशातील दळणवळणाचा खर्च कमी होणे आवश्यक असून, ते रस्त्यांद्वारेच शक्य आहे. सध्या प्रगत देशाच्या तुलनेत दळणवळणाचा खर्च आपल्याकडे अधिक आहे. तो सध्याच्या सोळावरून नऊ टक्क्यांवर आणला जाईल.
दरम्यान, सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करत आहे. यामुळे टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल, अशी माहिती मंत्री गडकरी यांनी दिली.