Pune (Dhayari) पुण्याच्या धायरी भागात दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चक्क दुकानात शिरून आरोपींनी धमकी देत २५ ते ३० तोळे दागिने हिसकावले आहेत. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील धायरी भागात असलेल्या श्री ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विष्णू दहीवाळ यांच्या मालकीचे हे दुकान आहे. विशेष म्हणजे दरोडोखोरांनी त्यांच्याकडील प्लास्टिकच्या पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील 20 ते 25 तोळे सोने लुटुन नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान पळून गेलेल्या या तीनही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून हत्या, दहशत, अपघात, महिलांवरील अत्याचार, चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी पुणे शहर हादरुन जात आहे.. अशातच दिवसाढवळ्या घडणाऱ्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.