पुणे (Pimpri-Chinchwad)
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, पर्यटन, वाहतूक आणि नदी स्वच्छता यांसारख्या महत्वपूर्ण विषयांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी आढावा घेतला.
यावेळी पीएमआरडीए चे आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रीनाज पठाण आदी अधिकारी वर्ग व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पीएमआरडीएचा अर्थसंकल्प, मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. खासदार बारणे म्हणाले, मावळमधील कोथुर्णे, काळे कॉलनी, दारुंब्रे-लोहार वस्ती-साळूंब्रे ते चांदखेड हा रस्ता, सांगवडे ते नेरे, सांगवडे ते संत तुकाराम साखर कारखाना दरम्यानचा रस्ता, ब्राह्मणोली या रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करावीत व रस्ता नागरिकांसाठी खुला करावा.
एमएसआरडीच्या माध्यमातून जुना राष्ट्रीय महामार्ग (चार) हा राज्य सरकारला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे. या महामार्गावरील कान्हे, कार्ला फाटा, वडगाव, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, सेंट्रल देहूरोड येथील वाहतूक कोंडी सोडवावी. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएसआरडीए आणि पीएमआरडीएची संयुक्त बैठक घ्यावी. त्यानुसार येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी सूचना करीत सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे, असेही बारणे यांनी सांगितले.
पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात
टायगर, लायन्स पॉइंट येथील स्काय वॉकच्या कामाला गती द्यावी. एकविरा देवी मंदिर परिसरात प्रशस्त वाहनतळ विकसित करावे. डोंगरावरील हेलीपॅड, वेहरगाव पासून जाणारा पालखी मार्गाचा रस्त्याचा कामाला वेग द्यावा. तिकोणा, तुंग, राजमाची, लोहगड या चार किल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असून त्यातून किल्यांकडे जाणारे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहाची कामे पूर्ण करावीत आणिी पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.
नदी सुधार प्रकल्पाला गती द्या
पवना, इंद्रायणी नदी सुधारचे काम हाती घ्यावे. लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी, देहू, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करावेत. इंद्रायणीनदी लगत असलेल्या ३८ आणि पवना नदी काठच्या १८ गावात एसटीपी उभारले जाणार आहेत. इंद्रायणीसाठी ६७१ कोटी तर पवनासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याची कार्यवाही पीएमआरडीएने सुरु करावी, असे खासदार बारणे यांनी सांगितले.