पुणे (Pcmctahalka.in) विधानसभा उपाध्यक्ष या संसदीय पदाला खूप महत्त्व आहे. त्या पदाची गरिमा राखा. एका समाजासाठी काम न करता राज्यातील सर्वांना न्याय द्या. आता काम करून दाखवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना दिला.
विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. बनसोडे यांचा नागरी सत्कार उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बुधवार (दि.९) काळेवाडी येथे करण्यात आला. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, कविता आल्हाट, नाना काटे, मंगला कदम, सदाशिव खाडे, इरफान सय्यद, संदीप वाघेरे, चंद्रकांता सोनकांबळे तसेच, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अण्णा बनसोडे यांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले की, अण्णा आता सकाळी लवकर उठत जा. कुटुंबातील सदस्यांमुळे बदनामी होऊ नये म्हणून काळजी घ्या. मुलाला नीट सांभाळा. सर्व समाजाला न्याय द्या. एका समाजापुरते मर्यादित राहून स्वतःवर शिक्का बसवून घेऊ नका. पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्यात फिरून काम करा. विधानसभेच्या उपाध्यक्षा नीलम गो-हे यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असून, त्याप्रमाणे त्यांनाही दर्जा दिला जाईल.
सत्काराला उत्तर देताना अण्णा बनसोडे म्हणाले की, अजित दादांच्या उपस्थित झालेला हा माझा सर्वात मोठा सत्कार आहे. दादांसोबत एकनिष्ठ राहिल्याचे मला हे फळ मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी आतापर्यंत केलेली कामे, मित्रांची मिळालेली साथ, नागरिकांचे प्रेम या सर्वांची याप्रसंगी आठवण येत आहे.
या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, शहराध्यक्ष योगेश बहल, रिपाइंच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
अण्णासोबत राहिला म्हणून मोठा झाला..
सर्व पक्षीय राहून चालत नाही. आम्हीही पवार साहेबांना दैवत समजतो. मात्र देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही पाठबळ दिले. तळ्यात मळ्यात राहू नका. मूर्ती लहान असूनही अण्णा कोठे गेला पहा, असे म्हणत अजित पवार यांनी माजी आमदार विलास लांडे यांचे जाहीरपणे कान टोचले.