पुणे-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. प्रसूतीच्या कळा सुरू झालेल्या तनिषा सुशांत भिसे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं असता, प्रशासनाने उपचारापूर्वी 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
अडीच लाख रुपये देण्याची तयारी असतानाही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या रुग्णालयात हलवताना तनिषाची प्रकृती खालावली आणि जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेने रुग्णालयाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.महिला आयोगाची दखल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने पावलं उचलली आहेत. चाकणकर म्हणाल्या, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे एका मातेचा जीव गेला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही याची चौकशी करणार आहोत.” आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना तथ्य तपासून कार्यवाही करण्याचे आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. “महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
रुग्णालयाची प्रतिक्रिया
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी सांगितलं, “या घटनेची चौकशी केली जाणार आहे. आम्ही राज्य सरकारला अहवाल सादर करू. मीडियात येणाऱ्या बातम्या अर्धवट आहेत. आरोपांची तपासणी होईल, पण सध्या जास्त बोलता येणार नाही.” रुग्णालयाने आरोप फेटाळले असले तरी या प्रकरणाने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.