आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नंदुरबार

सुरेश धसांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा आरोप; म्हणाले, 'खोक्या' प्रकरणात माझा खून करण्याचा प्रयत्न

नितीन देशपांडे   151   01-04-2025 10:02:45

Beed Suresh Dhas-: 

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उचलून धरत जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्टाचं राजकारण तापवलं होतं.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंसह भाजप नेत्या पंकजा मुंडेंवरही टीकेची तोफ डागली होती. पण तेच सुरेश धस त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे चांगलेच बॅकफूटला गेले होते. याच 'खोक्या'वरुन आता सुरेश धसांनी (Suresh Dhas) आता पुन्हा एकदा बाजी पलटवताना गंभीर आरोप केला आहे.

आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी 'सरकारनामा'ला एक्सक्लुजिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या बॅटनं अमानुष मारहाण,उधळलेल्या नोटा,हरणाच्या शिकारी यांवरुन होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देतानाच सर्वात मोठा धक्कादायक खुलासा केला आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात विमानाची तिकीटं फाडून थेट बिश्नोई समाजाची लोकं मुंबईत आणण्यात आली. त्यांना सुरेश धसांना खोक्यानं हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगितलं.

खोक्या जो वाळू कॉन्ट्रक्टर आहे, वनविभागाच्या जागेत राहत होता, बेनटेक्सचे दागिने घालून फिरत होता. तसेच मुथोट फायनान्समधून आणलेले पैसे उधळत होता. त्याची 4 ते 5 लाखांचीही प्रॉपर्टी नसेल,हाच तो खोक्या जो टीव्हीवर दाखवण्यात आला. त्याच्या घरात वाघार बिघारचं मांस सापडलं असेल. पण तेच वनविभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी उचलून नेलं. आता पारध्याच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे का, अशी मिश्किल टिप्पणीही आमदार धस यांनी यावेळी केली.

सुरेश धस म्हणाले, परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि म्हणाले,सुरेश धसला खोक्यानं (Satish Bhosale) हरणाचं मांस पुरवलं. माझ्यावर एवढी वाईट पाळी आली का,माझ्या आयुष्यात 16 वर्षे मी माळकरी राहिलेला माणूस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे मी करतो. पण माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही. स्वत:प्राणीव पशू-पक्षी प्रिय माणूस आहे.मला काय माहिती त्यांच्या घरात काय सापडलं असं म्हणत धस यांनी विरोधकांचा खोक्यानं मांस पुरवल्याचा दावाही फेटाळून लावला.

माझ्या मतदारसंघात असं स्टेटमेंट येऊन एकानं करायचं आणि दुसर्यांनं मुंबईत विमानाची तिकीटं फाडून मुंबईत बिश्नोई समाजाची चार दोन माणसं आणायची. बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन करायचं. तो लॉरेन्स बिश्नोई.त्यांच्या समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे. तिथपर्यंत असं नेऊन ठेवायचं की, सुरेश धस हरणाचं मांस खातो. म्हणजे काय तुमची मानसिकता आहे, असंही त्यांनी आरोप विरोधकांवर केला.

 

 

म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे. इतक्या खालच्या स्तराला जर तुम्ही जात असाल तर तुमच्याबरोबर दोस्ती काय कामायची. हे राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांना आपण सांगणार आहोत. इतक्या दिवस आपण हे कधी बोललो नव्हतो. बिश्नोई समाजाची तीन-चार लोकं विमानाची तिकीटं फाडून जर मुंबईत आणात असाल,आणि त्यांना जर खोक्याविषयी सांगून मला जीवनातून उठवण्यापर्यंत तुम्ही गेले ना. यापाठीमागं कोण कोण लोकं आहेतहे मला माहीत असल्याचंही धस यावेळी म्हणाले.

खोक्या भोसलेचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत होतं. खोक्या भोसलेने हरणांची शिकारसुद्धा केल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्या माध्यमातून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचं मांस पुरवत होता, असे आरोपही काही लोकांनी केले होते. याच आरोपाच्या मुद्यावर बोलताना आता धस यांनी एका मुलाखतीत हा आरोप केला आहे. बिश्नोई गँगला मुंबईत आणलं गेलं आणि माझ्या खुनाचा डाव, कट रचण्याचा प्रयत्न झाला असा धक्कादायक खुलासा धस यांनी एका खासगी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केला.

 

ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणावी लागेल, कारण खोक्या भोसलेचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं. खोक्या भोसले हा बराच काळ फरारही होता. नंतर त्याला अटकही झाली, त्याचं घरही पाडण्यात आलं होतं. त्याच्या घरात वन्यप्राण्याचं वाळलेलं मांस सापडल्याचा मुद्दाही समोर आला होता. आणि त्याचाच आधार धरून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचं मांस पुरवत होता अशा स्वरुपाचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.