पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या 'माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर'ची पायाभरणी कार्यक्रम येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून माधव नेत्रपेढी कार्य करत असून कित्येक लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम सातत्याने होत आहे. दृष्टी ही ईश्वराने दिलेली सर्वात मोठी भेट असून दृष्टिहिनांना दृष्टी देण्यापेक्षा मोठी सेवा कोणतीही असू शकत नाही. आपल्या स्वयंसेवकांनी गेल्या 30 वर्षांपासून ही सेवा निरंतर सुरु ठेवली असून यात सातत्याने वाढही होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशामध्ये मोठ्या प्रमाणावर नेत्र सेवा कार्याची आवश्यकता आहे. आता लोक केवळ नेत्रदानाचा संकल्पच करत नाहीत तर नेत्र दानदेखील करत आहेत, अशा काळात माधव नेत्रालयसारख्या संस्था संपूर्ण देशभरात उभ्या राहण्याची आवश्यकता आहे. माधव नेत्रालय केवळ नागपूर, विदर्भ, महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण मध्य भारतासाठी महत्त्वाची संस्था ठरणार आहे. या संस्थेमुळे अनेक लोकांना दृष्टीदोषापासून मुक्ती मिळेल, दृष्टी मिळेल, भगवंताने दिलेला आशीर्वाद प्राप्त होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष व महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानचे संस्थापक स्वामी गोविंददेव गिरी महाराज, जुन्या आखाड्याचे पीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, माधव नेत्रालयाचे महासचिव अविनाश अग्निहोत्री व इतर मान्यवर उपस्थित होते.