पुणे (Pune news)
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण कुलुषित झालं आहे. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. याच वादातून नागपुरात धार्मिक दंगल देखील घडली. त्यामुळे महाराष्ट्रात धार्मिक तणाव वाढला आहे.अशी एकूण स्थिती असताना पुण्यात मात्र धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देणारी घटना समोर आली आहे. इथं एका हिंदू महिलेच्या भावाचं निधन झाल्यानंतर एका मुस्लीम व्यक्तीने मृतदेहाला अग्नी दिला आहे. याबाबतचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुस्लीम व्यक्तीच्या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रास्ता पेठ भागात जयश्री किंकळे आणि त्यांचे ७० वर्षीय बंधू सुधीर किंकळे राहतात. त्यांना फारसे नातेवाईक नाहीत. भाऊ आणि बहीण दोघेचं एकमेकांच्या सुखा-दु:खाचे साथी होते. अशात बुधवारी सायंकाळी सुधीर यांचं निधन झालं. सख्ख्या भावाचं निधन झाल्यानंतर जयश्री यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. एकमेव आधार हरवल्याने जयश्री हवालदिल झाल्या होत्या. मात्र नियतीनं एक भाऊ हिरवला असला तरी त्यांच्या पदरात दोन भाऊ टाकले. मायकेल साठे आणि जावेद खान यांनी जयश्री यांच्या मदतीला धावत, सुधीर यांच्या चितेला अग्नी दिला. जावेद खान हे उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी फेसबूकवर पोस्ट करत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
जावेद यांनी 'पवित्र रमजान महिन्यात केलेले पवित्र कार्य' अशी शीर्षकाने एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, 'काल मला माझे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सुधीर किंकळे (वय : 70 पत्ता 286 रास्ता पेठ , पुणे) हे राहत्या घरी मृत पावले आहेत. त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंकळे. त्यांना कोणीही नातेवाईक नाहीत त्यामुळे तु त्यांचा अंत्यविधी करता का?जात_धर्म बाजूला ठेऊन सकाळी लवकरच उठलो. आज खूप काम होती, पण सगळी कामं बाजूला ठेऊन ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवले. त्यांना अजून एका शुभमची साथ लाभली मायकल कॉल करत होता त्याला बोललो वैकुंठ येथे पोहोच आणि तिथे आम्ही सगळेच त्या सुधीर काकाचे नातेवाईक झालो आणि त्यांचा अंत्यसंस्कार केले.