अहिल्यानगर प्रतिनिधी -(Nagar news ) पाथर्डी शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर पूर्व भागातील उंच डोंगरावर मोहटादेवीचे स्वयंभू स्थान आहे. देवस्थान समितीने लोकवर्गणीतून कोटयावधी रूपये खर्चुन भव्य मंदिर उभारले आहे. देशातील देवी मंदिरापैकी सर्वात मोठे आकर्षक मंदिर सुध्दा प्रेक्षणीय असून संपूर्ण मंदिराची रचना श्री यंत्रकार आहे. आश्विन शुद्ध प्रतिप्रदेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अशी पंधरा दिवस यात्रा येथे चालते. नवसाला पावणारी अशी या मोहटा देवीची ख्याती आहे. जागांच्या कल्याणासाठी रेणुकादेवी येथे प्रकट झाली आणि मोहटा देवी म्हणून प्रसिद्ध झाली अशी आख्यायिका सांगितली जाते.
इथे दूध, तूप विकलं जात नाही…
एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा वाट चुकलेल्या म्हशी आल्या. म्हशी काही दिवस सांभाळून ज्यांच्या असतील त्यांना देऊ अशीच भावना ठेवून ग्रामस्थांनी त्या ठेवून घेतल्या. अनेक दिवस वाट पाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांच्या नाकेदारांना कळली व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला. आणि त्यांना बोलावून बंदिस्त करण्याचे आदेश केला. चोरीचा आळ आलेल्या बिचाऱ्या भक्तांस या गोष्टीचे खूप दुःख झाले. दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोहटादेवीची आळवणी केली.
खडा पहारा केला उपवास केला व नवस केला. आई, यापुढे आम्ही गायी-म्हशीचे दूध, तूप, विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणारदेखील नाही, परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहून मोहटादेवीची कृपा झाली. दुसऱ्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतून म्हशीचा काळा रंग बदलून पांढरा झाला. आदल्या दिवशी पाहिलेल्या ह्या म्हशी नाहीत हे नाकेदारांच्या लक्षात आले.व त्यांनी बंदिस्त करण्याचा हुकुम रद्द केला. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दूध, दही, तूप विकत नाहीत. व देवीस अर्पण केल्याशिवाय खातही नाहीत.
कसे जाल ?
मुंबई पासून : मुंबई ते अहमदनगर या मार्गावर बस, रेल्वे किंवा खासगी वाहनाने जाता येते
पुण्याहून : पुणे ते नगर हे अंतर जवळपास तीन तासांचे आहे. पुण्याहून बसने सहज जाता येते.
नगरला पोहोचल्यानंतर नगर ते पाथर्डी या साठी अनेक बस किंवा खासगी वाहने उपलब्ध असतात.
पाथर्डीला पोहोचल्यानंतर तिथून देवीच्या गडावर जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध आहे.