मुंबई प्रतिनिधी- प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचा रविवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. त्यात कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता केली होती. ही कविता शिंदे गटातील कार्यकर्त्यांना चांगलीच झोंबली.
अखेर एका वृत्तवाहिनीला बोलताना एकनाथ शिंदे यांनी कामरा आणि दिवसभर झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मी कुणालाही बोलत नाही. शांत रहाणे, काम करणे, कामावर फोकस केंद्रीत करणे आणि लोकांना न्याय देण्याचे काम करतो. मी तोडफोडीचे समर्थन करत नाही. समोरच्याने देखील आरोप करताना कुठल्या स्तराला जातो, हे पाहिले पाहिजे. एक्शनला रिअॅक्शन असते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे म्हणाले, "मी आरोपांवर प्रतिक्रिया देत नाही. तीन वर्षांपूर्वी सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोक झाडत आहेत. आरोपांना मी कामाने उत्तर देणार, हे मी नेहमी सांगायचो. आरोपांना आरोपाने उत्तर द्यायला लागलो, तर आपला फोकस बदलतो. आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिले. त्यामुळे जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. 80 पैकी 60 जागा आम्हाला मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा निवडून आणता आल्या."
"अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु, तुम्ही गैरफायदा घेऊन विडंबन करू शकता. मात्र, हा एकप्रकारचा व्यभिचार, स्वयराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचे काम केले. मी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. याच माणसाने सर्वोच्च न्यायालय, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमन, अर्णब गोस्वामी, उद्योगपतींबद्दल काय विधाने केली आहेत, ते पहा. हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केले आहेत. त्यामुळे मी प्रतिक्रिया दिली नाही. मी बोलणार सुद्धा नाही. मी काम करणारा माणूस आहे," असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
"मी तोडफोडीचे समर्थन करत नाही. समोरच्याने देखील आरोप करताना कुठल्या स्तराला जातो, हे पाहिले पाहिजे. एक्शनला रिअॅक्शन असते. मी संवेदनशील आहे. मला सहन करण्याची खूप ताकद आहे. मी कुणालाही बोलत नाही. शांत रहाणे, काम करणे, कामावर फोकस केंद्रीत करणे आणि लोकांना न्याय देण्याचे काम करतो. त्यामुळे दैदिप्यमान यश मिळाले आहे," असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.