पुणे (It park grampanchyt) मिळकत कर वेळेत न भरल्याने नेरे ग्रामपंचायतचे दोन सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी याबाबत निकाल दिला आहे.सन २०२१ मध्ये नेरे ग्रामपंचायतची निवडणूक झाली. त्यामध्ये अजित ओव्हाळ व राजू जाधव सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर सन २०२३-२०२४ च्या मिळकतकराची थकबाकी भरण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतकडून नोटीस बजावण्यात आली होती. परंतु बिल मिळाल्यानंतर नव्वद दिवसांच्या आत त्यांनी कराची रक्कम भरली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ नुसार त्यांना अपात्र करण्यासाठी नेरे ग्रामस्थ राहुल जाधव यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.
जिल्हा परिषदेकडून तक्रारीबाबत अहवाल मागवून राहुल जाधव यांचा तक्रार अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला होता. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध राहुल जाधव यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील केले होते. त्यामध्ये दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत सुनावणी होऊन, राहुल जाधव यांनी दाखल केलेले अपील मंजूर करण्यात आले. त्यात जिल्हाधिकारी पुणे यांचा आदेश रद्द करून ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र करण्याचा निर्णय अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी दिला आहे. या सर्व प्रकरणात तक्रारदार राहुल जाधव यांच्या वतीने कायदेतज्ज्ञ ॲड. अमित आव्हाड, सोपान मुंडे, आणि योगेश गराडे यांनी काम पाहिले.