आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 सिंधुदुर्ग

अपार्टमेंट आणि सोसायटी गृहनिर्माण संस्था महत्त्वाचा फरक! बिल्डर याप्रकारे करतात फसवणूक

शिंदे राम   155   24-03-2025 09:45:50

पुणे (ऍड. रिशिकेश हेडा) 91+ 7875559285 सदर लेखक हे पुणे येथे प्रॉपर्टी व दिवाणी वकील आहेत.

Pune news - कोणताही बिल्डर एखादी इमारत बांधली की त्यामधील फ्लॅट, दुकाने, गोडाऊन आदींची विक्री करतो. त्यासाठी करारनामा अथवा ट्रान्सफर डिड करून आवश्यक ते मुद्रांक शुल्क भरून फ्लॅट / दुकाने खरेदी घेणाऱ्याच्या नावावर केले जाते. त्यानंतर संपूर्ण इमारत पूर्ण झाल्यावर व तिला भोगवटा प्रमाणपत्र ज्याला आपण ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (Occupancy Certificate) किंवा कम्प्लीशन सर्टिफिकेट (Completion Certificate) सुद्धा म्हणतो, ते मिळाल्यावर त्या इमारतीखालील जमिनीचे हस्तांतरण सदर फ्लॅट / युनिट / दुकाने विकत घेणाऱ्याच्या नावे करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. कित्येक वेळेला ही जबाबदारी बिल्डर पार पाडत नाहीत आणि मग इमारतीतील रहिवाशांना भविष्यात त्रास सोसावा लागतो. अशा प्रकारे बिल्डर सदरच्या जमिनीमध्ये हक्क राखून ठेऊन सदर इमारतीच्या रिडेव्हलपमेंट च्या वेळी आडमुठेपणा करून पैशांची मागणी करतात किंवा स्वत: रिडेव्हलपमेंट करीन यासाठी बळजबरी करतात.  हा सर्व त्रास होऊ नये व बिल्डर, विकासक, जमीन मालक व त्यांचे वारसदार यांची मनमानी चालू नये म्हणून शासनाने डीम कन्व्हेन्स ही संकल्पना पुढे आणली. बऱ्याच वेळी अशा प्रकारे इमारत पूर्ण झाल्यावर बिल्डर एक तर सोसायटी स्थापन करतो किंवा अपार्टमेंट स्थापन करतो त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला यातील फरक समजत नाही. म्हणूनच या दोन्ही संकल्पना मध्ये असणारे फरक हे आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून त्याबद्दलच्या आपल्या संकल्पना स्पष्ट होतील.

रेरा कायद्याप्रमाणे बहुसंख्य युनिट बुक झाल्यावर तीन महिन्यांच्या आत इमारतीतील रहिवाशांची गृहनिर्माण संस्था अथवा अपार्टमेंट असोसिएशन स्थापन करणे बिल्डरवर कायद्याने बंधनकारक आहे. याशिवाय कलम १७ प्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यावर तीन महिन्यांच्या आत कन्व्हेन्स करून देण्याची जबाबदारीदेखील बिल्डर- प्रमोटर यांच्यावर आहे.

आता आपण अपार्टमेंट आणि सोसायटी यामधील महत्त्वाचा फरक पाहू या.

• अपार्टमेंटमध्ये प्रत्येक युनिट हे स्वतंत्र असून ते हस्तांतरित करता येते. अपार्टमेंट मालकाचा त्यावर पूर्ण अधिकार असतो. अपार्टमेंट मालकाच्या क्षेत्रफळाच्या अनुषंगाने त्याला इमारतीखालील जमिनीवर देखील हक्क प्राप्त होतो. गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत मात्र जमीन व इमारत ही गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची असते व सदस्याला भोगवटादार म्हणून त्याचा वापर करता येतो. 

• गृहनिर्माण संस्थेमध्ये कन्व्हेन्स अथवा डीम कन्व्हेन्स झाल्यावर इमारत आणि बिल्डिंग ही गृहनिर्माण संस्थेच्या म्हणजेच को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची होते त्यानंतर एखादी सदनिका विकली गेली व एखादा सदस्य बदलला तरी गृहनिर्माण संस्थेच्या मालकी हक्कांमध्ये काही फरक होत नाही अपार्टमेंटच्या बाबतीत प्रत्येक अपार्टमेंटधारकाला त्या अपार्टमेंटचा पूर्ण मालकी हक्क प्राप्त होतो.

• अपार्टमेंटमधील अपार्टमेंटधारकांची असोसिएशन स्थापन करून प्रत्येक अपार्टमेंटधारक हा त्याचा सदस्य असतो.

• अपार्टमेंटमध्ये सामायिक खर्च हा प्रत्येक अपार्टमेंटच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो व ते गृहनिर्माण संस्थेसारखे सामायिक खर्च सर्वांना समान नसतात.

• गृहनिर्माण संस्थेमध्ये एखाद्या सदस्याने आपली सदनिका, गाळा, दुकान विकले तर गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी हस्तांतरण शुल्क आकारू शकते. अपार्टमेंटच्या बाबतीत असा व्यवहार झाल्यास त्या ठिकाणी ट्रान्सफर फी आकारली जाऊ शकत नाही.

• गृहनिर्माण संस्थेत एखादी सदनिका भाड्याने दिल्यास त्या ठिकाणी बिन भोगवटा शुल्क आकारता येते अपार्टमेंटच्या बाबतीत अशा प्रकारचे शुल्क आकारता येत नाही.

• अपार्टमेंटमध्ये सामायिक सोयीसुविधांबरोबर डीड ऑफ डिक्लेरेशनमध्ये वेगळा उल्लेख केला असल्यास उदा. जायचा यायचा वेगळा रस्ता, गच्चीचा काही भाग इत्यादी या गोष्टी त्या अपार्टमेंट होल्डरला राखीव म्हणून ठेवता येतात. मात्र गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत असा फरक करता येत नाही. गृहनिर्माण संस्थेमध्ये नॉमिनेशन करणे सक्तीचे आहे, तर अपार्टमेंटमध्ये नॉमिनेशन सक्तीचे नाही.

• अपार्टमेंटमध्ये जागेच्या आकारानुसार मतदानाचा अधिकार ठरतो. गृहनिर्माण संस्थेमध्ये तो सर्वांना समान असतो.

• अपार्टमेंट डीड जर बिल्डरने करून दिले नाही तर सिव्हिल कोर्टामध्ये दावा लावून ते कोर्टामार्फत करून घेता येते, तर गृहनिर्माण संस्था ही जर बिल्डरने स्थापन केली नाही तर खरेदीदार डिम कन्व्हेन्स करून गृहनिर्माण संस्था स्थापन करू शकतात. इमारतीच्या पुनर्विकासासंबंधी शासनाने जी नियमावली लागू केली आहे, ती गृहनिर्माण संस्थांना लागू होते ती अपार्टमेंटना लागू होत नाही. 

याप्रमाणे अपार्टमेंट व गृहनिर्माण संस्था यांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे ती म्हणजे कायद्यामधील नवीन सुधारणेनुसार गृहनिर्माण संस्थेप्रमाणे अपार्टमेंट मेंटेनन्स वसुलीसाठी सहकार उपनिबंधकांकडे दाद मागता येऊ शकते.

अशा प्रकारे अपार्टमेंट व गृहनिर्माण संस्था यांमध्ये फरक आहेत. सदर फरक वाचक वर्गाला सोप्या भाषेत समजावा यासाठी हा केलेला प्रयत्न! धन्यवाद.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.