पुणे (Pcmctahalka.in) स्काय फोर्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. या चित्रपटात वीर पहाडिया इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या देवय्या यांची भूमिका साकारत आहे. अलीकडेच वीरने त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर मनाला स्पर्श करणारी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये वीरसोबत, शहीद अज्जामद बोपय्या देवय्या यांची पत्नी सुंदरी देवय्या आणि मुलगी दिसत आहे. अज्जामद यांच्या कुटुंबाला ‘स्काय फोर्स’ चित्रपट आवडला. हे अज्जामद बोपय्या देवय्या कोण होते? युद्धात त्यांनी फक्त आपल्या सहकाऱ्यांचेच प्राण वाचवले नाहीत, तर पाकिस्तानला सुद्धा जोरदार दणका दिलेला.
इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या एक उत्तम पायलट होते. 70 वर्षांपूर्वी 1954 मध्ये फायटर पायलट म्हणून ते IAF मध्ये रुजू झाले. फायटर जेट उडविण्यात ते माहीर होते. 1965 साली भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असताना अज्जामद यांच्यावर इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग कॉलेजमध्ये युवकांच्या ट्रेनिंगची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी आपली जबाबदारी चोखरित्या वठवलीच. पण त्याचवेळी हिम्मत आणि शौर्य दाखवत देशासाठी अनेक मोहिमा पार पडल्या.
थेट फायटर जेट घेऊन सरगोधाच्या दिशने उड्डाण
1965 साली पाकिस्तान विरुद्ध युद्ध सुरु झाल्यानंतर अज्जामद यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देशाच्या पहिल्या एअर स्ट्राइक मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी दिली होती. या मिशनमध्ये त्यांची जबाबदारी एका शिक्षकाची होती. पण, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सहकाऱ्यांना त्यांची आवश्यकता आहे, त्यावेळी थेट फायटर जेट घेऊन त्यांनी सरगोधा एअर बेसच्या दिशेने उड्डाण केलं.
म्हणून त्यांचा मृतदेह अखेरपर्यंत कुटुंबाला नाही मिळाला
एका डॅमेज प्लेनसह उड्डाण करणाऱ्या अज्जामद यांचा सामना अमेरिकी एफ-104 मधील पाकिस्तानी फ्लाइट लेफ्टनेंट अमजद हुसैन यांच्याशी झाला. पण त्यांची हिम्मत डगमगली नाही. बोपय्याय यांनी पाकिस्तानी पायलटला आपल्या सहकाऱ्यांच्या मागे जाण्यापासून रोखलं. अमेरिकी बनावटीच्या एफ-104 ला त्यांनी कडवी टक्कर दिली. यामध्ये बोपय्याय यांचं विमान कोसळलं. पाकिस्तानी भूमीवर मृत्यू झाल्यामुळे अखेरपर्यंत त्यांचा मृतदेह कुटुंबाला मिळू शकला नाही.
मरणोपरांत महावीर चक्र पुरस्कार मिळालेले एकमेव अधिकारी
शहीद अज्जामद बोपय्या देवय्या यांच्या मृत्यूनंतर 23 वर्षांनी त्यांना 1988 साली सरकारकडून मरणोपरांत महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अज्जामद बोपय्या देवय्या भारतीय वायुसेनेच असे एकमेव अधिकारी आहेत, ज्यांना मरणोपरांत हा प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाला.