बीड (Pcmctahalka.in) दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सायबर ठगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना वाढत असतानाच बीडच्या माजलगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
या घटनेत ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून पतसंस्थेने ग्राहकांच्या पैशांवरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ
माजलगाव शहरातील धुनकेश्वर अर्बन निधी पतसंस्थेने जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून 40 लाख रुपयांची फसवणूक केली. त्रिंबक यादव यांनी 21 लाख 84 हजार रुपये, कौशल्याबाई यादव यांनी 8 लाख 3 हजार रुपये, आणि कावेरी खेत्री यांनी 10 लाख 37 हजार रुपये या पतसंस्थेत ठेवले होते. मात्र, अनेक वेळा मागणी करूनही ठेवी परत दिल्या नाहीत आणि वारंवार टाळाटाळ करण्यात आली.
अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
यामुळे ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार माजलगाव शहर पोलिस ठाण्यात धुनकेश्वर अर्बन निधीचे चेअरमन शिवहरी अशोक यादव, सचिन रोडगे आणि इतर सदस्यांविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेवीदारांची चिंता वाढली
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अनेक पतसंस्थांकडून ठेवीदारांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अशा घटनांमुळे ठेवीदार मोठ्या चिंतेत आहेत.