मुंबई प्रतिनिधी- (Pcmctahalka.in)
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी (Devendra Fadnavis) विधिमंडळात याबाबत घोषणा केली आहे.राम सुतार हे सुप्रसिद्ध भारतीय शिल्पकार आहेत. त्यांचे पूर्ण नाव राम वंजी सुतार असे आहे. धुळे जिल्ह्यातील गोंदूर या खेडेगावात त्यांचा जन्म झाला होता. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यांचे बालपण अतिशय खडतर आणि संघर्षाच्या स्थितीत गेले. परंतु, लहानपणापासून त्यांना शिल्पकलेची आवड होती. पुढे त्यांना त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. राम सुतार पुढील शिक्षणासाठी मुंबईतील सर जेजे आर्ट ऑफ स्कूलमध्ये आले. प्रतिरुपण व शिल्पकलाविषयक पदविका मिळवली.देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात उंच शिल्प राम सुतार यांनीच डिझाइन केले होते. या शिल्पाच्या निर्माण काळात ते अनेक दिवस गुजरातेतच होते. सध्या राम सुतार केम्पेगौडा येथे एक 90 फूट उंचीची मूर्ती तयार करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळ सभागृहात केली.