पुणे (Pune news)
महापालिकेकडुन थकबाकी भरण्यासाठी नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणे सिंहगड इन्स्टिट्युटला चांगलेच भोवले आहे. संस्थेच्या वडगाव बुद्रुक येथील कार्यालय, मिळकती व कोंढवा बुद्रुक येथील मिळकतींवर महापालिकेने मंगळवारी जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला जप्त केलेल्या ४९ मिळकतींची २६६ कोटी रूपयांचा मिळकतकर संस्थेने थकविला आहे.
सिंहगड इन्स्टिट्युटच्या शहरात आंबेगाव बुद्रुक, कोंढवा बुद्रुक व एरंडवणे येथे महाविद्यालये, शाळा, संस्थेची कार्यालये अशा मिळकती आहेत. संस्थेच्या विविध ठिकाणच्या मिळकतींचा तब्बल ३४५ कोटी रूपयांचा मिळकतकराची थकबाकी आहे. महापालिकेच्या मिळकतकर आकारणी विभागाकडुन संस्थेला थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती.
त्यानंतरही संस्थेकडुन थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, महापालिकेने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एरंडवणे येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय जप्त केले होते. संबंधित कार्यालय व मिळकतीची ४७ कोटी ४३ लाख इतकी थकबाकी होती. ही थकबाकी भरण्याकडेही दुर्लक्ष केल्यानंतर अखेर महापालिकेने एरंडवणे येथील कार्यालयाचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यापाठोपाठ महापालिकेने मंगळवारी वडगाव बुद्रुक येथील ४३ मिळकती जप्त केल्या आहेत. त्यांची १९८ कोटी ६१ लाख इतकी थकबाकी आहे, तर कोंढवा बुद्रुक येथील ६ मिळकती जप्त केल्या असून त्यांची थकबाकी २० कोटी ५० लाख इतकी आहे. एरंडवणे, वडगाव बुद्रुक व कोंढवा बुद्रुक या तिन्ही ठिकाणच्या मिळकतींची एकुण थकबाकी २६६ कोटी रूपयांहून अधिक आहे.