कुदळवाडी प्रतिनिधी :: - कुदळवाडी, चिखली परिसरात अतिक्रमण केलेल्या अनधिकृत गोदामे, भंगार दुकानांसह लघुउद्योगांवर महापालिकेची 8 फेब्रुवारीपासून जोरदार कारवाई सुरू आहे. या कारवाईत आत्तापर्यंत येथील व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मात्र, कुदळवाडी परिसरात 1 हजार एकरवर ही अनधिकृत बांधकामे होताना महापालिका प्रशासन झोपले होते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे संपूर्ण अतिक्रमण हटविल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या 1 हजार एकरवर शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांचा डोळा असल्याची चर्चा होऊ लागली आहे. हा लोण्याचा गोळा कोणाच्या घशात जाणार, या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.
दुसरीकडे अतिक्रमण कारवाई केल्यामुळे 1 हजार एकर जागा मोकळी होणार आहे. या भागात जागेला 35 ते 40 लाख रुपये प्रतिगुंठा भाव आहे. या मोक्याच्या जागेवर शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांचाही डोळा असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जवळपास एक हजार एकर जागा मोठ्या बिल्डरच्या घशात जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे; यामागे नेमका कोण आहे व गोरगरिबांच्या घशातील घास काढणारा लोकप्रतिनिधी देखील कोण आहे अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागले आहेत.