पुणे (Pcmctahalka.in)-
अवैध धंद्यांवर छापे घालण्याचे आदेश दिल्यानंतर ती माहिती हुक्का पार्लरचालकाला देणार्या वानवडी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या विलास पवार या पोलीस उपनिरीक्षकाला अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी निलंबित केले आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार असे त्याचे नाव आहे. विशाल पवार हा वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीला होता. विशेष म्हणजे प्रशिक्षनला गेला असतानाही तेथून तो हॉटेलचालकांना पोलिसांची रेड पडणार असल्याची माहिती देत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
वानवडी बाजार पोलीस चौकीच्या हद्दीत ११ ठिकाणी रेस्ट्रॉरंटमध्ये हुक्का पार्लर चालू आहे, त्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी आदेश दिले होते. लुल्लानगर येथील विजेता रुफटॉप हॉटेल येथे छापा कारवाईचे वेळी हॉटेलचालक राहुल सुरेखा जैनसिंघाल याचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यात इतर माहिती हुक्का पार्लर संदर्भात मिळते का हे पाहण्यासाठी मोबाईल तपासणी करत असताना व्हाट्सअॅप कॉल हिस्ट्री चेक केली. त्यात वानवडी बाजार पोलीस चौकी येथे नेमणुकीस असलेले परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार याचे नाव राहुल जैनसिंघाल याने पोलीस पीएसआय पवार सर वानवडी न्यू या नावाने सेव्ह केला असून २६ डिसेंबर रोजी रात्री २० वाजून ४३ मिनिटांनी कॉल केल्याचे दिसून आले.
याबाबत राहुल जैनसिंघाल याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने विशाल पवार याचा मेसेज व कॉल आला होता. त्यामुळे सतर्क होऊन हुक्का सर्व्हिस बंद करीत असताना पोलिसांची रेड झाली, असे लेखी जबाबात सांगितले. तसेच विशाल पवार याला महिन्याला २० हजार रुपये देत असल्याचे म्हटले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे व्हाट्सअॅप ग्रुपवर २६ डिसेंबर २०२४ रोजी पुणे शहरातील वानवडी, कोंढवा, काळेपडळ, लष्कर, कोरेगाव पार्क व विमाननगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हुक्का पार्लर सुरु असल्याचा संदेश पाठवला होता.
राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ येथे प्रशिक्षणासाठी कार्यरत असताना वरिष्ठांनी फारवर्ड केलेला अवैध धंद्यांवरील कारवाई करण्याबाबतचा मेसेज राहुल जैनसिंघाल यांना पाठविलेला व पोलीस कारवाई होणार याची आधीच सूचित केल्याचे दिसून येते. तसेच २६ डिसेंबर रोजी सुटीवर असणारे मार्शल हरिचंद्र पवार याने हॉटेल विजेताचे मालक राहुल जैनसिंघाल यांना व्हाट्सअॅप कॉल केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विशाल पवार याला निलंबित करीत असल्याचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.