पुणे ग्रामीण प्रतिनिधी ::
पुण्यातील सिंहगड पायथा फिरायला गेलेले शासकीय ठेकेदार आणि डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची नोव्हेंबर महिन्यात हत्या करण्यात आली होती. विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण केल्यानंतर तासाभरात आरोपींनी त्यांचा खून केला, यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते.
पोळेकर हत्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती, पण मुख्य सूत्रधाराला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे.
19 नोव्हेंबर 2024 ला सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर फिरायला गेले होते. बराच वेळ विठ्ठल पोळेकर घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोळेकर यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं, पण या हत्येचं कारण आता समोर आलं आहे.
शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्या निर्घुण हत्या करणारा मुख्य सुत्रधार जेरबंद; पावणे दोन महिने पोलिसांना देत होता गुंगारा, सातारा-पुणे रोडवरील सारोळा पुलाजवळ लागला हाती
विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण झाले तरी कार सध्या योगेश भामे याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन हे अपहरण योगेश भामे यानेच केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जबलपूरहून शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देवीदास थोरात (वय २४, रा. बेलगाव ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले होते. मुख्य आरोपी योगेश भामे हा फरार होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तैनात करण्यात आली. ही पथके सातत्याने आरोपीचा शोध घेत असताना योगेश भामे हा कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक कोल्हापूरला रवाना झाले. त्याच सुमारास भामे हा कोल्हापूरहून पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाली. सातारा ते पुणे रोडवरील सारोळा पुलाजवळील परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस पथकांनी सापळा लावून योगेश भामे याला पकडले.
योगेश भामे याच्याविरुद्ध एकूण ९ गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे आर्थिक लाभासाठी केलेले असून त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.