पुणे
पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणात नऱ्हेगावच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.
सुशांत सुरेश कुटे (रा. चैतन्य बंगला, मानाजीनगर, नऱ्हे) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुटे हा नऱ्हेगावचा माजी उपसरपंच आहे. समर्थ नेताजी भगत (वय २० वर्षे, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी,अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
२५ नोव्हेंबर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कुटे यांच्या ऑफिससमोर हा प्रकार घडला होता. समर्थ हा त्याच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या गाडीतून पेट्रोल काढत असल्याच्या संशयावरून आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी त्याला लाथा बुक्यांनी, काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.
गुन्हा झाल्यापासून अर्जदार आरोपी फरार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबामध्ये आरोपीचे नाव आलेले आहे. या प्रकरणात पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे तो उपसरपंच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून आर्थिक देखील मजबूत आहे त्यामुळे लोकांना असा संशय आहे की पैशावर हे प्रकरण दाबले जात असल्याची भावना जनसामान्यात पाहायला मिळत आहे
या प्रकरणी समर्थचे वडील सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप वडील नेताजी भगत यांनी केला आहे. याप्रकरणी गौरव संजय कुटे (वय 24) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय 20) राहुल सोमनाथ लोहार (वय 23, सर्व रा. मानाजीनगर, नऱ्हे) यांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, आरोपींनी समर्थला मारहाण करताना तयार केलेले व्हिडिओ पोलीसांना मिळाले असून पोलीसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. तसेच माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा पसार झाला असून, त्याचा शोध सुरु आहे.