पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या 13 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी दिली जाणार आहे.
यंदा जवळपास साडेनऊ हजार शाळांची नोंदणी केली जाणार असून, एक लाखाहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राथमिकशिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाते. संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीद्वारे देण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी 18 डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली.
नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली. परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली. सध्या आरटीई पोर्टलवर दिसून येत असलेल्या आकडेवारीनुसार 8 हजार 316 शाळांची नोंद झाली असून, 1 लाख 1 हजार 474 जागा उपलब्ध झाल्या आहेत.