दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे दाेन दिवसांपूर्वी सायंकाळी वाहतूक नियमन करत असताना दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमांचा भंग केला. विरुद्ध दिशेने निघालेल्या त्या महिलेला पोलीस शिपाई तांबे यांनी अडवून कारवाई करताना तिने पोलीस शिपाई तांबे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
तांबे यांनी सहकारी महिला पोलीस शिपाई चव्हाण यांना घटनेची माहिती दिली. पोलीस शिपाई चव्हाण तेथे आल्या, तेव्हा तांबे आणि चव्हाण यांना शिवीगाळ करून दुचाकीस्वार महिलेने पुन्हा त्यांच्याशी झटापट करून ती पसार झाली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.