पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयातील नोकर भरतीला राज्याचा हिरवा कंदील मिळाला आहे. आकृतीबंदाला मंजुरी दिल्यानंतर आता राज्याने सेवा प्रवेश नियमावली जाहीर केली आहे.
पीएमआरडीएच्या स्थापनेपासून वरिष्ठ पदांवर विविध विभागातील अधिका-यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक केली जात होती. तर, कारकून, शिपाई ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत होती. प्राधिकरणात वर्ग एक ते वर्ग चारच्या विविध पदांवर वेगवेगळ्या विभागामध्ये कर्मचा-यांची आवश्यकता आहे. त्यानुसार पीएमआरडीएकडून राज्याकडे मागणी पत्र सादर केले होते. त्यापैकी विधी अधिकारी, लिपिक, मुख्य विधी अधिकारी, शाखा अभियंता या पदांसाठी शासनाकडे माहिती पाठवली असून ही पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जवळपास 150 पदे भरणार
राज्य सरकारने पीएमआरडीएच्या आकृतीबंधाला यापूर्वीच मंजुरी दिली होती. मात्र, सेवा प्रवेश आणि सेवांचे वर्गीकरण (विनियम २०२३) या नियमावलीची मंजुरी प्रलंबित होती. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे सहसचिव यांनी याबाबत नुकताच शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे पीएमआरडीएकडून विविध विभागांतील सेवा नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांपैकी काही पद जिल्हा निवड समितीमार्फत भरली जाणार आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या दोन कंपन्यांमार्फत त्या पदांची माहिती पाठवण्यात आलेली आहे. त्यामध्ये लघुलेखक, कनिष्ठ आरेखक, सर्वे रियर, वाहन चालक आणि शिपाई या पदांचा समावेश आहे. त्यामुळे ही पदे भरण्याबाबत प्राधिकरणामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.