आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

महानगरपालिकेच्या वतीने नगर शहरातील महिलांना महिला बचत गटांना ५३ लाखांचे कर्ज

नितीन देशपांडे   94   04-01-2025 09:40:57

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्र महानगरपालिकेने स्थापन केलेल्या महिला बचत गटांना शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या ५३ लाख रुपये कर्ज मंजूर करत त्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, शहरातील पथविक्रेत्यांनाही कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते १८ महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना एक ते दहा लाखांच्या दरम्यान एकूण ५३ लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीची पत्रे वितरीत करण्यात आली. तसेच, शहरातील दहा पथ विक्रेत्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आली. यावेळी उपायुक्त संतोष टेंगळे, प्रियंका शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आशिष नवले, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक अमोल चावरे, शाखा व्यवस्थापक उपेश कुमार, युको बँकेचे अमित ठाकर, आयसीआयसीआय बँकेचे गोविंद गठलेवार, एनयुएलएम विभाग प्रमुख बाबासाहेब बेल्हेकर, शहर व्यवस्थापक निलेश शिंदे, सुप्रिया घोगरे, समुदाय संघटक अश्विनी रासकर, करिश्मा शेख, कांचन उमाप, हरिकृष्ण ठोंबरे आदी उपस्थित होते.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, आजच्या आधुनिक काळातही सावित्रीबाईंचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी सुरू केलेल्या चळवळींमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली गेली आहेत. त्यांचे कार्य केवळ भारतीय समाजापुरते मर्यादित नाही, तर जागतिक स्तरावरही स्त्रियांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक करण्यासाठी प्रेरणादायी आहे. आज शिक्षणासह इतर विविध क्षेत्रात महिला आघाडीवर कार्यरत आहेत. अनेक व्यवसायातही महिलांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच शहरात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून महिला बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.