पुणे- इंडिया डुटेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेवंत रेड्डी म्हणाले, अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वकल्पना न देता ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये आला होता. त्यामुळं एकच गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. त्यात ३९ वर्षीय महिला मृत्यूमुखी पडली असून तिचा लहान मुलगा कोमामध्ये आहे. अल्लू अर्जुन थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहून गेला असता तरी काही हरकत नव्हती. पण त्याने ग्रँड एंट्री घेतली. गाडीच्या सनरुफमधून बाहेर येत तो लोकांना हातवारे करत होता, त्याच्या चाहत्यांना अभिवादन करत होता. यामुळे लोक नियंत्रणाच्या बाहेर गेले. रेड्डी पुढे म्हणाले, “सगळे लोक त्याच्या अटकेबद्दल बोलत आहेत. पण चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं काय? तिचा मुलगा अजूनही कोमात आहे, तो बरा झाल्यानंतर त्याची आई कुठंय हे विचारेल, तेव्हा त्याला काय सांगायचं?अल्लू अर्जुनने चित्रपट बनवला आणि पैसे कमवले. त्याच्याशी सामान्य माणसाचे काहीच देणंघेणं नाही. अल्लू अर्जुननं सीमेवर जाऊन देशासाठी युद्ध केलं आहे का? मग त्याचा एवढा गवगवा कशासाठी?”