निगडी प्रतिनिधी
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सर्व राजकीय पक्ष करताना दिसत आहेत, अशातच पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
याबाबतची मोठी घोषणा भाजप आमदार शंकर जगतापांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने आम्ही सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेत असणारी महायुती पालिका निवडणुकीत तुटणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगतापांनी हे जाहीर केलं आहे. मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत अजित पवारांचे शिलेदार नाना काटे उपस्थित असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. नाना काटे पालिकेची निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढणार का? अशी चर्चा ही यानिमित्ताने रंगलेली आहे.
नाना काटेच्या उपस्थितीतवर काय म्हणाले जगताप?
विधानसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले नेते नाना काटे हे देखील या भाजपच्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीला उपस्थित होते, ते यावेळी भाजपकडून लढणार आहेत का? याबाबतची काही चर्चा झाली आहे का, या प्रश्नावर बोलताना शंकर जगताप म्हणाले, नाही, नाना काटे एक नगरसदस्य म्हणून आलेले होते, ते महायुतीचे घटक देखील आहेत, महानागरपालिकेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्या पध्दतीने होईल. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशी माहिती देखील यावेळी एबीपी माझाशी बोलताना शंकर जगताप यांनी दिली आहे.