लातूर जिल्हा
महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी नाशिकमध्ये समर्थकांच्या मेळाव्यात आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या भुजबळांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ हे परदेश दौऱ्यावर गेले होते, त्यानंतर आज ते नाशिकमध्ये परतणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे राजकीय घडामोडींपासून दूर आहेत.
तर दुसरीकडे बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना खंडणीच्या आरोपामध्ये व हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारवर आहेत. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.
यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, “अजित पवारांच्या शांत राहण्याने कदाचित धनंजय मुंडेंची विकेट काढून मंत्रिमंडळात भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का? हा प्रश्न चार पाच दिवसांपासून पडत आहे. अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत, त्यामुळे भुजबळांना वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल.नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पर्याय आहे. भेटीत काही तरी झालंच असेल. भाजप त्यांना देशाचा ओबीसींचा नेताही करून टाकेल. तोही पर्याय छगन भुजबळ यांच्यापुढे राहील”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून काय फायदा, त्यांच्यापुढे पर्याय काय आहे? त्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाकडे जाण्याचा एक पर्याय आहे. नाही तर दुसरा घरी बसण्याचा पर्याय आहे. ओबीसी नेत्यांचा महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वापर करून त्यांचा दुरुपयोग केला किंवा त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवले. एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेत्याला, ज्यांच्यामुळे महायुतीला मतं मिळाली, त्याचा फायदा प्रचंड मोठ्या प्रमाणात महायुतीला झाला आणि छगन भुजबळांच्या हातात भोपळा दिला आहे”, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.