आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 मुंबई शहर

पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक भाजपात जाण्याची शक्यता ठाकरे गटाला मोठा धक्का

शरद लाटे  2   02-01-2025 13:22:41

पुणे :: - 

महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. पुढील आठवड्यात या नगरसेवकांबरोबर काही पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याने पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या भाजप, शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसला. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठांकडून पक्ष वाढीसाठी कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप करून दोन माजी नगरसेवकांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, ओसवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आता तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई सोडून इतर ठिकाणी पहावे, असे म्हणत लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाच माजी नगरसेवकांसह अन्य काही पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का मानला जात आहे.

पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही. पक्ष वाढविण्यासाठी खूप कष्ट घेतले. जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नको आहे, असे वाटत आहे. शिवसेनेने खूप प्रेम दिले, ती सोडताना खूप त्रास होत आहे. पण निर्णय हा घ्यावा लागतो. माझ्यासह अजून काही पदाधिकारीदेखील शिवसेना सोडण्याचा निर्णय लवकरच घेतील, असे माजी नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले.

५ जानेवारी रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे , प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे हे नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका मध्ये देखील मोठ्या प्रमाणात यश मिळवण्याच्या दृष्टीने महायुती मधील पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे .


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.