कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत मासिक सभेत हजर नसलेल्या सदस्याच्या नावे ठराव करत असल्याचा आरोप केला आहे.
ग्रामपंचायतचे सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांनी मागील मासिक सभेत विकास कामांचा ठराव झाला नसताना मनमानी करत त्या कामांना मंजुरी देत प्रोसेडिंग मध्ये टाकले. याबाबत उपस्थित सदस्यांनी बहुमताने कोणतेही नवीन काम करायचे नाही असे ठरले असताना सरपंच व ग्रामसेवकांनी कामे टाकली. तसेच न ठरलेली कामे देखील प्रोसेडिंग मध्ये मांडताना सभेत हजर नसलेल्या सदस्याचे नाव सूचक म्हणून टाकल्याचा तसेच दोघे संगनमताने कोणालाही विश्वासात न घेता एकाच वार्डात जास्त कामे करत असल्याचा आरोप करण्यात आला. उपसरपंच सविता घावटे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य विक्रम गव्हाणे, केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे, गणेश कांबळे, शिल्पा फडतरे, मनीषा गव्हाणे, शैला फडतरे, अर्चना सुपेकर यांनी आज होणाऱ्या मासिक मिटिंगवत बहिष्कार टाकला आहे. सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी करत असल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देत सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे. १ जानेवारीच्या आदल्या दिवशी नऊ सदस्य उपोषणाला बसणार असल्याने याबाबत गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंग साठी सतरा पैकी फक्त पाच सदस्य हजर असल्याने मिटिंग तहकूब केली आहे सभाशास्त्रा प्रमाणे सदर सदस्यांनी ३१ डिसेंबर च्या तहकूब सभेत हजर राहून आपले मत मांडावे असे आवाहन सरपंच संदीप ढेरंगे यांनी केले.