सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आज आयोजित केलेल्या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील सहभागी झाले होते
यावेळी आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांचे कथित व्हॉट्सअॅप संभाषण व्हायरल केले. मात्र हे स्क्रीनशॉट एडिटेड असल्याचा दावा करत आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.
रुपाली ठोंबरे यांच्यावर पलटवार करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट मॉर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असून देखील सत्य-असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट वायरल केला. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपले आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हा चॅट या भूमीवर अवतरला. मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला? असो, बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदवलेला आहे," अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.