नाशिक
महाजन, भुसे, कोकाटेंची नावं चर्चेत
नाशिक | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले. त्याच्यात भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातदेखील भारतीय जनता पक्षाला वजनदार खाती मिळाली आहेत. आता पालकमंत्रिपदावरून मोठी चुरस निर्माण झाली असून नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजपने दावा केल्याचे समजते. त्यातच गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
जिल्ह्यातील १५ पैकी सात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. तसेच दोन आमदार असूनही मागच्या वेळेस शिवसेनेचा पालकमंत्री होता, म्हणून सेनेलाही पालकमंत्री पद पाहिजे आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेच वाढला आहे. भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन प्रसिद्ध आहेत.
२०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळेला ते नाशिकचे पालकमंत्री होते. त्यावेळेस संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या देखरेखीत सुरळीत झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. २०१२ साली झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीतदेखील महापालिकेची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आता पुन्हा महापालिका निवडणूक असून २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर ३१ डिसेंबरपर्यंत रजेवर गेल्याने दोन दिवसांपूर्वी २४ डिसेंबरला त्यांच्या जागी शासनाने मनीषा खत्री यांची प्रभारी म्हणून नेमणूक केली होती. दुपारी तसे आदेशदेखील मनपाला प्राप्त झाले होते. मात्र त्याच दिवशी काही तासांतच थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेवरून राहुल कर्डिले यांची महापालिका आयुक्तपदी नियमित नियुक्ती करण्यात आली. खत्री यांना त्यावेळी प्रभारी चार्ज देण्यात आले होते तर कर्डिले यांना कायमचे आदेश मिळाले होते. २८ तारखेला ते मनपात येऊन चार्ज घेणार होते. मात्र कर्डीले यांच्या नियुक्तीत महाजन यांना विचारण्यात न आल्याने ते नाराज झाल्याचे समजते. ही गोष्ट थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत गेल्याने त्यांनी त्वरित त्यावर निर्णय घेत महाजन यांच्या मर्जीनुसार खत्री यांच्या नावाची सुचना केल्याने आज खत्री यांचे मनपा आयुक्त म्हणून आदेश काढण्यात आले. या बदलाबदलीत महाजन यांचे वजन दिसून आल्याने तेच पालकमंत्री होतील, अशी माहिती मिळाली आहे..
२०२७ मध्ये नाशिकमध्ये होणा-या कुंभमेळ्याचे नियोजन मंत्री म्हणून गिरीष महाजन यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना पालकमंत्री करण्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यात सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे व दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तर सेनेच्या दोन पैकी दादा भुसे यांना देखील कैबीनेट मंत्री करण्यात आले आहे. मात्र पाच आमदार असूनही भाजपची पाटी कोरीच असल्याने भाजपकडून महाजन यांना आता पालकमंत्री करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. तरीही कोकाटे व भुसे यांचे नाव चर्चेत आहे.