राम शिंदे नाशिक :: -
नाशिक -भारतीय संरक्षण दलाच्या देवळाली कॅप येथील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये (एमईएस) कार्यरत एका इंजिनिअर वराकडे त्याच्या नववधूसह सासरच्यांनी ५३ लाखांची खंडणी मागितली आहे. विशेष म्हणजे विवाह झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नी पसार झाली आणि तिने पतीस ‘फारकत पाहिजे असेल तर ५३ लाख रुपयांची मागणी करत खंडणी द्यावी लागेल’ असे नातलग व मित्रांकरवी सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी पथक उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथे जाणार आहे.
मनिष राकेशकुमार गर्ग (वय ३६, रा. आर. एस. मार्ग, देवळाली कॅम्प, नाशिक, मुळ रा. पंचमुखी, मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित सुरेंद्रकुमार
जयस्वाल, तनूषा जयस्वाल, सिध्दांत जयस्वाल, बालेश गुप्ता, सचिन पाराशर (सर्व रा. देहरादून, उत्तराखंड) आणि सिरील (रा. मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गर्ग हे एमईएसमध्ये कार्यरत असून काही महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.विवाह झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची पत्नी माहेरी पसार झाली. त्यांना ही माहिती कळताच त्यांना जीवात जीव आला. पण, वरील संशयितांनी संगनमत करुन १२ मे ते १६ ऑगस्ट या कालावधीत गर्ग यांना फोनद्वारे संपर्क साधून ‘या लग्नात आमचा जास्त खर्च झाला, तुम्हाला फारकत पाहिजे असेल तर ५३ लाख रूपये द्यावे लागतील, पैसे दिले नाहीतर खोटा गुन्हा दाखल करून नोकरी घालवून टाकू, अशी धमकी देऊन खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केली. दरम्यान, लग्नाला दोन दिवसही उलटत नाही, तोच पत्नी पसार झाल्याने व तिच्याकडून खंडणीची मागणी होत असल्याने त्यांनी देवळाली कॅप पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांच्या सूचनेने महिला उपनिरीक्षक मिताली कोळी अधिक तपास करत आहेत.
विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयितांपैकी एक व्यक्ती हा फिर्यादी गर्ग यांचा सख्या मामा आहे, असे कळते. त्यामुळे विवाहनंतर त्यांनी हा डाव का रचला? केवळ पैशांच्या हव्यासापोटी नावालाच हा विवाह केला का? याचा तपास पोलीस करत आहे. तसेच संशयितांकडे सखोल तपास करण्यासाठी त्यांचा ताबा घेतला जाणार असून त्यांच्या अटकेसाठी पथके लवकरच उत्तराखंड व उत्तरप्रदेशात जाऊन धडकणार आहेत. तसेच पैशांसाठी विवाहाचे नाटक करायचे, ते झाल्यावर विविध कारणे देऊन खंडणीची मागणी करणारे हे रॅकेट सक्रिय आहे का यादृष्टीनेही तपास केला जात आहे.