पिंपरी प्रतिनिधी ::- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या लेटर बॉम्बचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. खासदार बारणे यांना भाजप आमदाराने प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्यावर आरोप झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट राज्याच्या गृह विभागावर निशाणा साधला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप खासदार बारणे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याच्या गृह विभागाला लक्ष्य केल्याने चर्चांना उधाण आले होते.
भाजप आमदार अमित गोरखे दिले प्रत्युत्तर...
खासदार बारणे यांच्या लेटर बॉम्बमुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली. तर, दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी वादात उडी घेत खासदार बारणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. खासदार बारणे यांनी काळजी करू नये असं म्हणत त्यांना सबुरीचा सल्ला दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या गृहविभागात असे गैर प्रकार होणार नाही असं म्हणत आमदार गोरखे यांनी खासदार बारणे यांचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.