आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद लाटे  7   23-12-2024 22:23:03

मुख्यमंत्र्यांची २४ व्या पार्ले महोत्सवाला भेट

मुंबई दि. २३- पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

विलेपार्ले येथील पार्ले महोत्सवाला भेटी प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी महोत्सवाचे आयोजक आमदार पराग अळवणी, पार्ले टिळक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू,विलेपार्ले सांस्कृतिक मंडळाचे विश्वस्त अजित पेंडसे, साठे महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे, डॉक्टर अलका मांडके, अजित देशमुख, अरविंद प्रभू, सुशम सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्र ही महत्त्वाची आहेत. या क्षेत्रात सहभागी होणारी पिढी ही समाज आणि देश घडवणारी ठरते. या क्षेत्रातूनच संवेदनशीलता आणि स्पोर्ट्समन स्पिरिट नव्या पिढीमध्ये निर्माण होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की पार्ले महोत्सव हा पार्लेकरांचा हक्काचा महोत्सव आहे. या महोत्सवामुळे पार्लेकरांच्या कला- क्रीडा अशा सर्व गुणांना व्यासपीठ मिळाले आहे. गेल्या 24 -25 वर्षात महोत्सवात सहभागी अनेक स्पर्धक आज विविध क्षेत्रात नामवंत झाले आहेत. तसेच विलेपार्ले येथील एका मेट्रो स्टेशनला डॉ.रमेश प्रभू यांचे नाव देण्याचे आणि विलेपार्ले येथील महामार्गावरील उड्डाणपुलाला डॉ. नीतू मांडके यांचे नाव देण्याबाबत विविध बाबी तपासून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आमदार पराग अळवणी यांनी पार्ले महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवातील विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.