पिंपरी चिंचवड स्थायी समिती कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेली धाड ही घटना छोटा ट्रेलर आहे. अजून भाजपचा खरा भ्रष्टाचारी चेहरा समोर यायचा आहे. तो येत्या काही दिवसांत शहरातील जनतेसमोर येईल. भाजपने गेली साडेचार वर्ष सत्यतेचा मुखवटा घातला होता. मात्र, त्याआडून अनेक गैरकारभार महापालिकेत सुरू होते. आजच्या धाडीमुळे भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा. तसेच स्थायी समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी. भ्रष्टाचाराबाबत भाजपच्या शहराध्यक्षांनी उत्तरे द्यावीत. असे रोखठोक मत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी व्यक्त केले.
भ्रष्ट भाजपचा विकासाचा दावा खोटा… स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या दालनात घेतात नोटा…. चक्क महापालिकेत भ्रष्ट भाजपने सुरू केली वसुली….अशा टॅगलाईनवरती सत्ताधारी भाजपचा खरा चेहरा बुधवारी महापालिकेतील स्थायी समितीच्या बैठकीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई मधून समोर आला असल्याची टीका विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कडून होताना दिसत आहे.
🔴काय आहे हे प्रकरण
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समितीचे सभापती व भाजपचे नगरसेवक नितीन लांडगे यांच्यासह चार जणांना एसीबी पथकाने ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमुळं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज स्थायी समितीच्या बैठकीत धाड मारली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला.
महापालिकेचा एक ठेकेदार स्थायी समितीला देय ठरलेली २ लाख रुपये रक्कम घेऊन महापालिकेच्या पार्किंगमध्ये आला. त्याने मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे यांना पालिकेच्या पार्किंगमध्ये बोलावून गाडीमध्ये पैसे त्यांच्या ताब्यात दिले. त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पिंगळे यांना ताब्यात घेतले. त्यांला अधिकाऱ्यांनी थेट स्थायी समितीच्या कार्यालयात घेऊन गेले आणि सर्व कार्यालयाची झाडाझडती घेतली यामध्ये लाखो रुपये आढळल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व पैसे कशासाठी व कोणा कोणाकडून आले याची माहिती गोळा करत आहेत.
या चौकशीनंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांना काही कागदपत्रे व रोकड आढळली आहे.