आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पिंपरी -चिंचवड

कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणजे शरद पवार : राजू मिसाळ

PCMC तहलका न्यूज  19244   12-12-2020 05:48:00

पुणे प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्राने जर कुणाचं नेतृत्व निर्विवादपणे मान्य केलं असेल, तर ते शरद पवार यांचं. यशवंतरावांचा वैचारिक वारसा त्यांनी घेतलाच, पण त्याचबरोबर त्यांचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व इतकं बहुआयामी आहे की, त्यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांचा व्यासंग, त्यांची अभ्यासू वृत्ती, महाराष्ट्राच्या समस्यांची आणि त्याचबरोबर आधुनिक राहणी, विचारप्रवाह यांचीही सखोल जाण, अखिल भारतीय पातळीवरही स्वत:ची छाप पाडण्याजोगं कर्तृत्व आणि समाजाच्या विविध स्तरावरील व्यक्तीमध्ये-प्राध्यापक, लेखक, कलाकार, खेळाडू, शेतकरी, राजकीय कार्यकर्ते आणि सामान्यातला सामान्य माणूस यांच्यात सहजतेने वावरण्याचं विलक्षण संभाषण कौशल्य इत्यादी गुणामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व उठावदार व प्रभावी झालं आहे.

शरद पवारसाहेब सलग 60 वर्षे सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. गेल्या चाळीस वर्षांत तर देशपातळीवर महाराष्ट्राचा चेहराच शरद पवारसाहेब आहेत. 1967 साली पहिल्यांदा आमदार झाल्यापासून ते अगदी आतापर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीत पवारसाहेबांची सक्रिय भूमिका राहिली आहे. आज जो आधुनिक महाराष्ट्र आपल्याला उभा दिसतो, त्याची पायाभरणी यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी केलीच, पण हे काम पुढे नेण्याची जबाबदारी पवारसाहेबांवर येऊन पडली. पवारसाहेबांनीदेखील ती अत्यंत समर्थपणे पार पडली. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी घेतलेले निर्णय आपण पाहिले तर त्यातून त्यांच्या निर्णयांनी कशा प्रकारे महाराष्ट्र घडला आहे याची जाणीव होते.

 

पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी घेतलेले काही निर्णय या राज्याच्या समाजमनावर अत्यंत दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यात अर्थात पहिला उल्लेख नामांतर आंदोलनाचा करावा लागेल. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात झालेले सर्वात मोठे आंदोलन म्हणून नामांतर चळवळीचा उल्लेख करावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महान सुपुत्र या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला आणि त्यांचे नाव विद्यापीठाला द्यायला विरोध होतोय याच्या प्रचंड वेदना पवारसाहेबांना झाल्या. पडेल ती राजकीय किंमत मोजून साहेबांनी तो निर्णय घेतला आणि तो राबवला. फुले, शाहू, आंबेडकर यांचा वैचारिक वारसा खऱया अर्थाने शरद पवारच चालवू शकतात हे या निर्णयामुळे सिद्ध झालं.

 

पवारांना वेळोवेळी अनेकजण सोडून गेले. त्यांचा गैरफायदा घेतला, पण त्यांच्याविषयी त्यांनी कटुता बाळगली नाही. विरोधकांनी टोकाचे आरोप केले. तेव्हा सत्य कधीतरी लोकांना कळेल म्हणून खुलासे करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. कालांतराने ते खरेही ठरले. सहनशक्ती हा त्यांच्यातील मोठा गुण. तिच्या जोरावरच त्यांचा राजकीय प्रवास झाला. दिलेला शब्द त्यांनी कसोशीने पाळला. ज्याची पूर्तता होणार नाही, त्याबद्दल शब्द दिला नाही. त्यांच्याकडे दांडगी श्रवणशक्ती आहे. समोरच्याचे म्हणणे ऐकण्याची सोशिकता त्यांच्यात आहे. त्यामुळे खुट्ट झाले तरी पवारांकडे पुरती खबर असते. राजकारणात सतत विरोधकांशी दोन हात करतानाही कोणाशीही शत्रुत्व जोपासले नाही. शरद पवार नखशिखांत राजकारणी आहेत. याही वयात त्यांची इच्छाशक्ती तेज आहे. राजकारणापलीकडे अनेक क्षेत्रांत ते वावरतात, पण राजकारण हाच त्यांचा प्राणवायू आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावरच दुर्धर आजारांवर मात करू शकले. मी आहे असा आहे आणि लोकही असेच स्वीकारतील या विश्वासाने वावरतात. राजकारणाशिवाय ते जगूच शकत नाहीत. त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्याचा साधा विचारही त्यांना शिवत नाही, शिवणारही नाही.

साहेबांना मनापासून शुभेच्छा

जिवेत् शरद: शतम् ॥

लेखक हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आहेत राजू मिसाळ


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.