बाबूराव पाचर्णे - आमदार, शिरूर
PCMC तहलका न्यूज
23-09-2018 14:54:12
कुठलाही राजकीय वारसा किंवा बडा राजकीय वरदहस्त नसतानाही आमदार पाचर्णे यांनी राजकारणात केलेली यशस्वी व नेत्रदीपक वाटचाल "राजकारणातील एक आदर्श' म्हणूनच पाहिली जाते. विधानसभेच्या सलग पाच निवडणुका लढविणारे ते तालुक्यातील एकमेव राजकीय नेते असून, त्यांची राजकीय कारकीर्द तर्डोबाची वाडी या छोट्याशा गावच्या सरपंचपदापासून सुरू झाली. तत्पूर्वी केवळ एक सामान्य तरुण म्हणून उभारी घेणाऱ्या पाचर्णे यांनी शेतीत स्वतः घाम गाळला आहे. शेतीत पडेल ती कामे करताना जनावरांना लागणारा घास विकायला ते सायकलवरून शिरूर शहर व परिसरात येत असत. शेतीच्या व शेतीमालाच्या विक्रीच्या माध्यमातून त्यांनी संपर्क निर्माण केला. एक होतकरू व कार्यक्षम तरुण म्हणून पुढे त्यांना तर्डोबाची वाडी या गावच्या ग्रामपंचायतीत सदस्यपदाची व नंतर सरपंचपदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना त्यांनी गावातील तरुणांच्या मदतीने गावाच्या विकासाला चालना दिली व अल्पावधीतच तर्डोबाची वाडी हे गाव तालुक्याच्या नकाशावर आणले. त्यांना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांना संचालक म्हणून संधी मिळाली. त्यानंतर ते बाजार समितीचे सभापती झाले. पुढे पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे सदस्यही झाले. 1995 ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत केवळ 678 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या चार निवडणुका त्यांनी लढविल्या व त्यातील दोन निवडणुकांत विजय संपादन केला.