Pune
भारतात गेल्या 9 दिवसांत तीन वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 23 मे रोजी 19 मेच्या तुलनेत सरासरी 90 पैसे प्रति लिटर दरवाढ करण्यात आली होती. त्याआधी 15 मे रोजी इंधनाच्या किमतींमध्ये तब्बल 3 रुपयांची वाढ झाली होती.
आता तेल दराबाबत एक मोठा इशारा देण्यात आला आहे.
जागतिक ऊर्जा संकट असेच कायम राहिले तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आणखी वाढ होणे निश्चित आहे, असा इशारा भारत पेट्रोलियमचे संचालक राज कुमार दुबे यांनी दिला आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात मोठे चढ-उतार सुरू आहेत. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी धोरणकर्त्यांकडे आता अत्यंत मर्यादित पर्याय उरले असल्याचे दुबे यांनी सांगितले. त्यांच्या मते, या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्यांसमोर सध्या मुख्यतः तीन पर्याय खुले आहेत.
पहिला पर्याय म्हणजे पेट्रोल पंपांवरील इंधनाच्या किमती आणखी वाढवणे.
दुसरा पर्याय म्हणजे तेल कंपन्यांनी स्वतःच हा तोटा सहन करणे आणि आर्थिक नुकसान वाढू देणे.
तिसरा पर्याय म्हणजे सरकारने वित्तपुरवठ्याच्या माध्यमातून तेल कंपन्यांना निधी उपलब्ध करून देणे.
दुबे यांनी सांगितले की सुरुवातीला जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये 20 ते 50 टक्क्यांपर्यंत झालेली वाढ ही तात्पुरती मानली जात होती. मात्र आता परिस्थिती ज्या वेगाने बदलत आहे. त्यावरून हे संकट दीर्घकाळ टिकण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसत आहे.
त्यांनी म्हटले की, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या इन्फ्रास्ट्रक्चरची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार आहे. सध्याची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर इंधनाच्या किमतींमध्ये आणखी एक मोठी वाढ होणे पूर्णपणे निश्चित आहे. मात्र दर किती वाढतील याबाबत त्यांनी कोणताही आकडा सांगितला नाही.
भारताने आता तेल पुरवठ्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात बदलले आहेत. सध्या रशिया, आफ्रिका तसेच इतर अनेक भागांतून तेलाची आयात केली जात आहे. भारत पेट्रोलियम आणि इतर भारतीय ऊर्जा कंपन्यांनी आपल्या सोर्सिंग नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. यापूर्वी भारताकडे तेल पुरवठ्यासाठी केवळ 20 सप्लाय पॉइंट्स होते, मात्र आता ही संख्या वाढून 40 वर पोहोचली आहे.
मिडल ईस्टमधील तणाव 28 फेब्रुवारी रोजी वाढला होता, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर मोठे हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकी तळांवर हल्ले केले. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला दोन्ही देश युद्धविरामासाठी तयार झाले आणि तेव्हापासून पडद्यामागे शांतता करारासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
या युद्धादरम्यान इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केली होती. हा समुद्री मार्ग जगासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के तेल याच मार्गाने वाहतूक केले जाते.
युद्ध सुरू झाले तेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 70 डॉलर होती. मार्चपर्यंत हे दर वाढून 120 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर किमतींमध्ये चढ-उतार सुरू राहिले आणि दर 100 डॉलरखाली आले. सध्या ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत सुमारे 103 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे.